Friday 6 May 2016






शाहू महाराजांचा जन्म जून २६, इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे मे ६, इ.स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.
शाहू महाराजांचा २६ जून हा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी कोल्हापूरमध्ये आणि अन्यत्र काही ठिकाणी बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात.
कार्य
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी [ संदर्भ हवा ] त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाला.
‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.